pareshprabhu

निळू फुले

In Uncategorized on July 13, 2009 at 5:58 AM

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या गोवा भेटीत मी गतवर्षी घेतलेली त्यांची मुलाखत –


मराठी चित्रपटांसाठी चांगला

माहौल तयार झालाय! – निळू फुले

० निळुभाऊ, दीडशेहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये आपण भूमिका केल्या. अगदी ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या तमाशापटांपासून आजच्या “विश्वनाथ ः एक शिंपी’ पर्यंतचा आपला हा अभिनयप्रवास आहे. मध्यंतरी प्रेक्षक दुरावलेल्या मराठी चित्रपटांना आज पुन्हा चांगले दिवस येत आहेत असे म्हणायचे का?

०० विषयांतली विविधता आज वाढली आहे. महाराष्ट्र शासनही मदत करतेय. अनेक चांगली तरुण मुले आली आहेत. काही तरी निराळे करून दाखवण्याची त्यांची दांडगी इच्छा आहे. या सर्वांमुळे मराठी चित्रपटासाठी एक चांगला माहौल तयार झालेला आहे. अनेक निराळे विषय हाताळले जात आहेत. लोकांना ते आवडत आहेत. “श्र्वास’, “डोंबिवली फास्ट’ असे वेगळे विषय हाताळणारे अनेक चित्रपट येत आहेत.

० मराठी चित्रपटांत एक काळ व्ही. शांताराम, भालजींचा होता. अत्रे, गदिमांचा एक काळ होता. मग तमाशापटांची, त्यानंतर विनोदी चित्रपटांची लाट आली. नंतरच्या या लाटा आल्या आणि ओसरल्या. प्रेक्षकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. असे का झाले?

०० लोक तेचतेचपणाला, पुनरावृत्तीला कंटाळले. दृश्यांची, संवादांची, कथानकाची पुनरावृत्ती होऊ लागली. सर्वार्थाने त्याला लोक कंटाळले. कौटुंबिक जिव्हाळ्याचे चित्रपट असोत, वा तमाशापट असोत, त्यांचा अतिरेक झाला. मध्यंतरी आलेले विनोदी चित्रपट तर एवढे वाईट होते की एवढे घाणेरडे विनोदी चित्रपट पूर्वी कधीच नव्हते. खरे तर मराठी विनोद हा देशात प्रादेशिक पातळीवरचा सर्वांत उत्तम दर्जाचा विनोद आहे. जुन्या मराठी चित्रपटांतील विनोदाचे ह्रषिदांपासून अनेक दिग्गज कौतुक करीत असत. मास्टर अविनाश, राजा परांजपे, राजा ठाकूर अशी उत्तम मंडळी पूर्वी होती. पण त्यानंतर उत्तम विनोदी चित्रपटांच्या या परंपरेला गालबोट लावणारे चित्रपट येत गेले.

० सध्या मराठी चित्रपटांत जे वेगळे विषय हाताळले जात आहेत, त्यात आपल्या “विश्र्वनाथ ः एक शिंपी’ या नव्या लघुपटाचा उल्लेख अपरिहार्य आहे…

०० विश्र्वनाथ ः एक शिंपी ही गोष्ट वि. वा. शिरवाडकरांनी पंधरा वर्षांपूर्वी लिहिली. जागतिकीकरणातून येऊ घातलेल्या अनिष्ट गोष्टी त्या काळात शिरवाडकरांनी त्यात टिपल्या. नवीन जे येते आहे, ज्या गतीने येते आहे, त्याला तोंड देणे मराठी माणसाला कठीण होऊ लागले आहे. त्यातून एक शोकांतिका तयार होते आहे. हे पचवून याला तोंड दिलेच पाहिजे. केवळ आपली दुःखे आळवीत बसण्यात काही अर्थ नाही…

० सध्या मराठी चित्रपटांमध्येही “बिग बजेट’ चित्रपट येत आहेत. चित्रपटांची जाहिरातबाजीही प्रचंड होऊ लागली आहे. नुकत्याच आलेल्या “साडेमाडेतीन’ ने तर प्रचंड मार्केटिंग केले. पण चित्रपटांच्या यशाचे मापदंड काय असतील?

०० लोकमान्यता हाच महत्त्वाचा मापदंड. लोकांना जे आवडेल, तेच चालेल. मग तुम्ही कितीही मोठे बजेट घ्या, कितीही जाहिरातबाजी करा. सर्वसामान्य माणसाचे दोन, तीन तास बरे जाणार असतील, तरच तो चित्रपट चालेल. अनेक नव्या चित्रपटांनी हे सिद्धही केलं आहे. याहीपेक्षा आपण आता पुढचा विचार केला पाहिजे. आपण आपला दर्जा वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. इराणी चित्रपट आपण आवडीने बघतो. इराण हा खरे तर अतिशय गरीब देश. तेथे चित्रपटांची आपल्यासारखी परंपराही नाही. पण तरीही उत्तम चित्रपट तिथे निघताहेत. आपल्याही देशात हे पूर्वी घडत होतं. तपनदा वगैरेंनी असे चित्रपट काढले आहेत. आपल्या मराठीत बाबूराव पेंटरांनी असे चित्रपट दिले. जगाच्या पाठीवर जे चालू आहे, त्याच्याशी स्पर्धा करणं, त्याच्या जोडीने आपण जाण्याचा प्रयत्न करणं हे व्हायला हवं. तसे विषय आपण हाताळले पाहिजेत.

० पण मनोरंजनासाठी चित्रपटांकडे वळणारा प्रेक्षक अशा वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांकडे वळेल?

०० “डोंबिवली फास्ट’ का चालतो? त्यात मनोरंजन कमी, पण सामाजिक आशय अधिक आहे. जीवनाला जी गती आहे, ती त्यात आलेली आहे. माणसं आज बेजबाबदार होत चालली आहेत, त्यांचं चित्रण त्यात आलेलं आहे. प्रत्येक माणूस चांगलं वागला तर समाज अधिक निरोगी राहील. पण याची जाणीवच नसलेला समाज आज तयार होतो आहे, हे “डोंबिवली फास्ट’ मधल्या त्या तरुणाला अस्वस्थ करून सोडते आहे. अशा वेगळ्या चित्रपटांची जाण सर्वसामान्य प्रेक्षकांना येऊ लागली आहे आणि तो ते चित्रपटही आवडीने पाहतो आहे.

० केवळ मराठी चित्रपटांनाच वाहिलेली “झी टॉकिज’ सारखी २४ तासांची वाहिनी सुरू झालेली आहे. दूरचित्रवाणी माध्यमातूनही मराठी चित्रपट घरोघरी जात आहेत. हे पूरक आहे ना?

०० त्यातून तोटाच होतोय. चित्रपटगृहात जाऊन वाढलेल्या तिकीटदरात चित्रपट पाहण्याऐवजी घरच्या घरी टीव्हीवर पाहणे कमी खर्चीक वाटू लागले आहे. नाटकांच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे…

० पण यावर उपाय काय…?

०० गुणवत्ता हाच उपाय आहे. चंगळवाद कमी करून आपल्या लोकांनी आपल्या बजेटमध्ये चित्रपट केले पाहिजेत. कलाकारांपासून, तंत्रज्ञांपर्यंत, दिग्दर्शकांपर्यंत सर्वांनी मिळून हे केलं पाहिजे. आपल्या बजेटला परवडेल अशा रीतीने चित्रपटनिर्मिती केली पाहिजे.

० मराठी चित्रपटसृष्टीत सध्या “कास्टिंग काऊच’ प्रकरण गाजतंय. मराठी चित्रपटांमध्ये हयात घालवलेल्या आपल्याला ते ऐकून काय वाटलं?

०० वेदनादायक आहे. पण सर्वच व्यवसायांत तसे लोक आहेत. फक्त चित्रपटांतच आहेत असं नाही… (अधिक भाष्य करायचे टाळतात)

० मराठी चित्रपटसृष्टीत एक बेजोड खलनायक आपण रंगवलात. आपली अशी एक ढब त्या भूमिकांत दिसते. मग ती संवादफेक असेल, ती नजर असेल… प्रत्यक्षातले आपले व्यक्तिमत्त्व आणि या भूमिका यात तर जमीन अस्मानाचे अंतर आहे. मग हे जमले कसे?

०० (हसत व नम्रपणे) मी सेवादलात काम करताना राजकारण्यांना जवळून पाहिलं. त्यांच्या नकला करणं काही अवघड नव्हतं… पण त्यातून एक झालं. ग्रामीण प्रेक्षकांना त्यांच्या त्यांच्या गावांतली अशी सगळी मंडळी पडद्याच्या माध्यमातून समजू लागली. पण ग्रामीण जीवनावरील अशा चित्रपटांचाही पुढे अतिरेक झाला.

० मराठीतला आपला खलनायक तुफान गाजला. दहा – बारा हिंदी चित्रपटांतूनही आपण भूमिका केल्या. पण त्या प्रेक्षकांना तो खलनायक भावला नाही का?

०० असं आहे… हिंदी चित्रपटांत ते तुम्हाला घेतात ते तुम्ही चांगला अभिनय करता म्हणून नव्हे, तर वितरकाचा आग्रह असतो म्हणून. यांना काम दिलंत तर या भागात चित्रपट चांगला चालेल असं वितरक सांगतो, म्हणून निर्माता मराठीत नाव असलेल्या कलावंतांना घेतो. तुमच्याकडून किरकोळ कामं करून घ्यायची. मात्र, तुमचा लौकिक वा प्रसिद्धी याचा फायदा उठवायचा असं चालतं. माझं असं झालं की मी हिंदी चांगली नाही बोलू शकत असं मला वाटतं. याची खंत मला आहे. त्यामुळे कामं करताना व्हायचं काय की अभिनयाकडे दुर्लक्ष व्हायचं. भाषेकडे आणि संवादांकडेच लक्ष जायचं. पुढे हिंदी चित्रपटांतून काम करायचाही कंटाळा आला. असं किरकोळ काम करण्यापेक्षा करूच नये असं वाटू लागलं.

० चित्रपटांत येण्यापूर्वी राष्ट्र सेवा दलासाठी आपण लोकनाट्यं करायचात. आपल्या “कथा अकलेच्या कांद्याची’ मुळेच अनंत मानेंनी चित्रपटांत संधी दिली. तेव्हाचे ते दिवस कसे होते?

०० राष्ट्र सेवा दलाच्या मदतीसाठी आम्ही ही लोकनाट्यं करायचो. त्यात “कथा अकलेच्या कांद्याची’ होतं, “बिनबियांचं झाड’ होतं, “पुढारी पाहिजे’ होतं… दिवाळी, गणपतीच्या दिवसांत दौरे करायचे. त्यातून स्वतःसाठी मानधन वगैरे घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. सेवादलाचा संसार चालवण्यासाठी थोडे पैसे या लोकनाट्यांतून जमा होत होते एवढंच. राष्ट्र सेवा दलाच्या पुणे शहर शाखेचा खर्च त्यातून भागवत असू. दोन तीन पूर्णवेळ कार्यकर्ते होते तेव्हा. त्यांचा खर्च भागे. “कथा अकलेच्या कांद्याची’ चे दोनेक हजार प्रयोग झाले तेव्हा. तात्या माडगुळकरांची लोकनाट्यं होती करीत असताना पु.लं. चं “पुढारी पाहिजे’ केलं. ते लोकांना त्या काळीही आवडे. त्यात पुलंनी दिलेला संदेश महत्त्वाचा आहे. गाव सुधारण्यासाठी ते शहरातील पक्षनेतृत्वाला गावात बोलावतात. पण नंतर त्यांना कळतं की यांना खरं तर गावचे प्रश्नच माहीत नाहीत. गावात सुधारणा करायची असेल तर ती आपणच केली पाहिजे हा संदेश पुलंनी त्यात विनोदाच्या आधाराने सांगितला आहे. पन्नास वर्षांपूर्वी पुलंनी हा संदेश दिलाय लक्षात घ्या.

० राष्ट्रसेवा दलाच्याही आधी आपण विसाव्या वर्षी रवींद्रनाथांच्या कादंबरीवर नाटक लिहून दिग्दर्शित केलं होतंत ना?

०० हो. रवींद्रनाथांच्या कादंबरीवर ते नाटक होतं. कादंबरीचं नाव आठवत नाही, पण नाटकाचं नाव “उद्यान’ असं होतं. ती एका कुटुंबाची कथा आहे. डॉ. लागूंचे “झाकोळ’ ही टागोरांचीच कथा आहे. ती कादंबरी उत्तम आहे… मी भूमिका अनेक प्रकारच्या केल्या, पण माझा मूळचा पिंड सेवादलाचाच. मी केलेल्या भूमिका हा व्यवसाय होता. आजही ज्या पुरोगामी चळवळी चालतात, त्या सर्व चळवळींत भाग घेता येईल तेवढा घेत असतो. मतभिन्नता असणं असतंच. त्यावर चर्चा करणं महत्त्वाचं असतं. दुसऱ्याचं मत ऐकून घेण्याची सवय लागली की मग कटकट होत नाही.
आज जागतिकीकरणाची चर्चा आहे. जग जवळ येतंय असं आपण म्हणतो. काही राष्ट्रांकडे इतरांच्या बाजारपेठा काबीज करण्याची शक्ती आहे. याला तोंड दिलंच पाहिजे. अमर्त्य सेन वगैरेंचं हेच मत आहे. जागतिकीकरणाला तोंड द्यावेच लागेल. त्यांना घाबरून नाही चालणार.

० आपण सेवादलासारख्या आदर्शवादी चळवळीशी निगडित होता. आज समाजात मूल्यं हरवून गेली आहेत. आदर्श ढासळले आहेत. हे अधःपतन का झालं असावं?

०० भगवान बुद्धांनी दोन हजार वर्षांपूर्वी सांगितलं होतं की “हे सगळं अनित्य आहे’. नित्य असं काही नाही. सारं “अनित्य’, अशाश्र्वत आहे. आज भली माणसं भ्रष्ट होत चालली आहेत. हा बदलही लोकांना मानवत गेला. भ्रष्टाचारालाच सभ्यतेचं स्वरूप आलं. पूर्वी लोक टेबलाखालून पैसे घ्यायचे. आज टेबलावरून घेतात… (मोकळे हसतात) भ्रष्टाचारालाही मूल्य प्राप्त झालंय. समाजात भ्रष्टाचाऱ्यांना मान्यता मिळालीय. स्वातंत्र्य मिळत असतानाचा तो काळ मी जवळून पाहिला. तेव्हा माणसं खरोखरच स्वच्छ होती. आज झालेला बदल हा तापदायक आहे. पण हे होणारच. मात्र, नवीन मुलं पुढे येतील. हे नाकारून नवे घडवतील यावर माझा विश्वास आहे. लोहियांचं त्यावर सुंदर भाष्य आहे… “इतिहासका चक्र’. समाज, देश अशा सर्वच घटकांत हे घडते आहे. तरुण, बंडखोर मुलं शिखराकडे जाण्याचा प्रयत्न करताहेत. हे शिखराकडे जाणं सोपं असतं, पण तिथे टिकणं, जे मिळाले आहे ते टिकवणं मोठं कठीण असतं. तीच तर खरी कौशल्याची बाब असते, असं लोहियांनी त्यात म्हटलं आहे. मला ते खरं वाटतं. हे “इतिहासाचं चक्र’च आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: